मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (मंगळवारी) मुंबई,पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईला आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार)साठी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकणामध्येही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा ॲलर्ट देण्यात आला आहे.
आज मान्सून अंदमानमध्ये येण्याचा अंदाज
नैऋत्य मोसमी पाऊस आज (मंगळवारी ता 13 मे) अंदमान – निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला असून पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही येईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चोवीस तासांत निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या ठिकाणी अवघ्या काही तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने काल (सोमवारी) दिला. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात सोमवारी (दि.12 मे) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच, 13 आणि 14 मे रोजी राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह वळिवाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील कोकण-गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कोकण-गोव्यात मंगळवारी (ता. 13 ) आणि बुधवारी (ता. 14 ) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. पुणे आणि घाट विभाग, कोल्हापूर आणि घाट विभाग, सातारा, सांगली, बीड, धाराशीव येथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.


