Thursday, September 11, 2025

पुण्यातील रस्त्यांवर पाचशे, दोनशे, शंभरच्या नोटा आणि डाॅलरचा पाऊस,नोटा उचलण्यासाठी झुंबड

पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा विसर्जन मार्गांवर नवीन प्रकार निदर्शनास आला. गणेश मंडळांनी वापरलेल्या ‘पेपर ब्लास्ट’च्या माध्यमातून खेळण्यातल्या; पण खऱ्या भासतील अशा नोटा आणि डॉलरची उधळण करण्यात आली. पुण्यातील बहुतांश मंडळांकडून असा प्रकार करण्यात आला. त्यामुळे सर्व रस्त्यांवर ‘नोटां’चा खच पडल्याचे दिसून आले. नोटा उचलण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

यंदाच्या मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, मध्यवर्ती पेठांमधील भाग आणि जंगली महाराज रस्त्यावरील मंडळांनी ‘पेपर ब्लास्ट’चा वापर करून पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या हुबेहूब नोटा उधळल्या. या नोटा खऱ्या वाटून त्या उचलण्यासाठी भाविकांमध्ये काही ठिकाणी झुंबड उडाली. परंतु, या नोटा खेळण्यातल्या असल्याचे लक्षात आल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर हसू आवरले नाही. हा मनोरंजनाचा भाग असल्याचे अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली.

पुणे पोलिसांनी मंडळांना अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. यंदा गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावट आणि विसर्जनावर भर देण्यात आला होता. ‘पेपर ब्लास्ट’ या नव्या प्रकारामुळे मात्र नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी मंडळांनी अधिक जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘खेळण्यातल्या नोटांचा कचरा रस्त्यांवर पडून राहिला, याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे,’ असे पर्यावरण कार्यकर्ते नीलेश कांबळे म्हणाले.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरणूक पाहण्यासाठी सकाळी बाहेर पडलेल्या भाविकांना रस्त्यावर नोटा पडल्याचे दिसताच नोटा उचलण्यासाठी अनेक भाविक सरसावले. मात्र, त्यांना या नोटा खेळण्यातल्या असल्याचे समजले. रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांना संभ्रमात टाकणाऱ्या या प्रकारामुळे चांगलीच चर्चा रंगली. अनेक नागरिकांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. काहींनी गर्दीच्या ठिकाणी असे प्रकार घडल्याने दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles