अहिल्यानगर-गेल्या दोन महिन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूर परिस्थिती होती. झालेल्या नुकसानीतून वर येत असतानाच जिल्ह्यात 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा पावसाच्या इशारा देण्यात आल्याने शेतकरी वैतागला आहे. दरम्यान, या इशार्याने शेतकरी सतर्क झाला असून उरले सुरले पीक वाचविण्यासाठी धावपळ करीत आहे.देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 22 ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वार्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवस वादळी वार्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.
दरवर्षी दिवाळीआधी थंडीची चाहुल लागते. पण यंदा ऑक्टोबर हिट सुरू आहे. कमाल तापमान अनेक ठिकाणी 30-31 अंश सेल्सिअस आहे. थंडीची खरी चाहुल लागण्यासाठी कमाल तापमान खाली येणे गरजेचे असते. पण यावर्षी तसे दिसत नाही. शिवाय पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.


