आगामी महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण या चर्चांवर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही. राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची पक्षाच्या सर्व नेत्यांपासून कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठीवरून ते एकत्र येणार असेच म्हटले जात आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत मोठं विधान केले आहे. महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘मुंबईसह, ठाणे, नाशिक, कल्याण अशा सर्व ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका जिंकतील. या सर्व महानगरपालिकांवर आमची चर्चा सुरू आहे आता कोणतीही अघोरीशक्ती आली तरी, मराठी माणसाची वज्रमुठ तोडू शकत नाही.’ संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसे एकत्र निवडणुका लढणार हे आता निश्चित झाले आहे.
संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सांगितले की, ‘राज ठाकरे चुकीचे काय बोलले. मुंबईत काय नाशिक, ठाणे, कल्याण डोंबवलीमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहोत. याशिवाय आणखी महापालिका आहेत तिथं आमची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मराठी माणसाची ताकद आहे. आता कोणतीही अघोरी ताकद चालणार नाही.’
मटण-चिकन बंदीवरू संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही असा स्वातंत्र्य दिन पाहिला नाही. यांनी देश धर्मांध केला आहे. काँग्रेसने कुठे काय आणलं. कत्तलखाना शासकीय म्हणून बंद आहे. शासनाची सुट्टी आहे.’


