अहिल्यानगर -लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून युवतीने (वय 23) आत्महत्या केल्याची घटना भिंगारच्या गवळीवाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी मयत युवतीच्या वडिलांनी बुधवारी (1 ऑक्टोबर) सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी चौघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दीपक अशोक आव्हाड (रा. माणिकदौंडी रस्ता, पाथर्डी), दीपकची बहिण (नाव, पत्ता माहिती नाही), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली शिरसाठ व बाबूजी नाकाडे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. पाथर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मयत युवतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दीपक आव्हाड याने युवतीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सदरचा प्रकार 1 सप्टेंबर 2024 पासून ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान घडला आहे. जेव्हा पीडित युवतीने लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा दीपक टाळाटाळ करू लागला.
त्याचवेळी, दीपकची बहीण, ज्ञानेश्वर शिरसाठ आणि बाबूजी नाकाडे यांनी देखील आम्ही तुमचे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणून युवतीचा मानसिक छळ सुरू केला. हा सततचा शारीरिक आणि मानसिक त्रास असह्य झाल्याने युवतीने आपले जीवन संपवले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.


