अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलात नव्या उमेदवारांना संधी देण्यासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ ची अधिकृत जाहिरात प्रसिध्द झाली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या भरतीत एकूण ७३ रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या ७३ पोलीस शिपाई पदासाठी भरती होणार आहे. भरतीसंदर्भात उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी policerecruitment2025. mahait.org आणि http://www.mahapolice. gov.in या संकेतस्थळांवर संपूर्ण माहिती व आवश्यक दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
२९ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येतील. ही भरती प्रक्रिया राज्यभरात एकसमान रितीने राबविण्यात येणार असून, अहिल्यानगर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई या पदासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. भरतीची सविस्तर अर्हता, शारीरिक चाचणी, परीक्षा पध्दत, वयोमर्यादा आणि फी यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना वरील संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर पोलीस भरती प्रक्रिया रखडली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र जाहिरातीमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. या भरतीमुळे जिल्ह्यातील युवकांना पोलीस दलात दाखल होण्याची संधी मिळणार आहे.


