Tuesday, November 4, 2025

राज्यात लवकरच प्राध्यापकांची पदभरती, मुख्यमंत्र्यांनीच दिले स्पष्ट संकेत

पुणे : एनआयआरएफ क्रमवारीत शिक्षक विद्यार्थी गुणोत्तराबाबत गुण कमी होणे गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर लवकरच भरती करण्यात येणार आहे. प्राध्यापक भरतीबाबतच्या प्रक्रियेत राज्यपालांनी काही बदल केले होते. ते बदल आता पूर्ण झाले आहेत. त्यामुळे लवकरच प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या ८० टक्के जागांवर भरती करण्यात येईल आणि उर्वरित २० टक्के पदांनाही लवकरच मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. एनआयआरएफ क्रमवारीत राज्याची घसरण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या सर्वसाधारण गटात ९१ व्या स्थानावर फेकले गेले आहे. विद्यापीठांमद्ये प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्याचा फटका विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर वाढणे, संशोधनासह अनेक पातळ्यांवर बसत आहे. तसेच विद्यापीठांना दैनंदिन कामकाजातही अनेक अडचणी येत आहेत. एनआयआरएफमधील घसरणीच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षण क्षेत्रातून प्राध्यापक भरती होत नसल्याबाबत टीका करण्यात येत आहे. या अनुषंगाने फडणवीस यांनी प्राध्यापक भरतीबाबत भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी रिक्त पदांच्या ८० टक्के पदांवर प्राध्यापक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. तसेच ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी राज्यपालांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यपालांनी काही बदल केले. या बदलांच्या प्रक्रियेत काही वेळ गेला आहे. मात्र, हे बदल पूर्ण झाले आहेत. त्यामुळे लवकरच रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरली जातील आणि उरलेल्या २० टक्के पदांनाही सरकारकडून लवकरच मान्यता मिळणार आहे.

एनआयआरएफ क्रमवारीतील शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तराबाबत गुण कमी झाले आहेत. हे गंभीर आहे. इतरही काही बाबींमध्ये गुण कमी झाले आहेत. या अनुषंगाने राज्यातील कुलगुरूंशी चर्चा केली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनीही चर्चा केली आहे. त्या बाबत लवकर सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles