श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन
शिवसेना शहर प्रमुख किरण काळे व मनोज गुंदेचा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
अहिल्यानगर : श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या मालकीच्या स्टेशन रोड येथील हुंडेकरी चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत मंदीराबाबत दिलेल्या खोट्या तक्रारीची चौकशी होऊन अध्यक्ष व ट्रस्टी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख किरण काळे व मनोज गुंदेचा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. यावेळी मुख्य ट्रस्टी सुभाष मुथ्था, राजेंद्र शहा, लालचंदजी कासवा, जितेंद्र गांधी, किशोर भंडारी, विनोद शहा, दिनेश पटवा, दिपक शहा, संदीप शहा, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते,
निवेदनात पुढे म्हटले की, श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाची स्टेशन रोड येथे हुंडेकरी चाळ या नावाने ओळखली जाणारी जागा ट्रस्ट च्या मालकीची आहे. सदर जागा ट्रस्टला दि.२०/०१/१९७५ रोजी बक्षीसपत्राने मिळाली असुन तेंव्हापासून या जागेत भाडेकरुचा ताबा आहे. सदर बक्षीस पत्रामध्ये जैन मंदीर असल्याबाबत किंवा कुठलेही मंदीर असल्याबाबत उल्लेख नाही. सदरहु जागेत पूर्वीपासूनच भाडेकरू असल्यामुळे तिथे कधीही साधु भगवंताचे वास्तव्य नव्हते किंवा जाहीर प्रवचनाचे कार्यक्रमही झाले नाही व या जागेत कधीही मंदीर अस्तित्वात नव्हते अशी खरी वस्तुस्थिती असतांना जाणुन-बुजून दुष्ट हेतुने ट्रस्टला व ट्रस्टीला बदनाम करण्यासाठी व खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्या ठिकाणी मंदीर होते असे भासवुन तसा खोटा तक्रारी अर्ज उबाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिला आहे याची सखोल चौकशी होऊन अर्जदाराविरुध्द खोटा व दिशाभुल करणारा तक्रारी अर्ज दिल्याबद्दल त्यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी.सदर जागा आम्ही कोणासही साठेखत किंवा खरेदीखताने दिलेली नसून ती आजही संस्थेच्याच मालकीची आहे असे निवेदनात म्हंटले आहे.


