राज्यातील भावी शिक्षकांना मोठा दणका बसला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण परंतु व्याहवसायिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यामुळे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत. एकूण २ हजार २०७ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविलं आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे अर्ज भरताना बी.एड. परीक्षेचे व डी.एल.एड. परीक्षेसाठी बसल्याचे (अपीअर्ड) अर्जात नमूद केले होते, या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य होतं.
या मुदतीत कागदपत्र सादर न केल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आलेल्या २ हजार ५३७ विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली होती. त्यानंतरही एसएमएसद्वारे कळवून २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. यापैकी २ हजार २०७ विद्यार्थ्यांनी मुदतीत कागदपत्रे सादर केले नसल्याचे समोर आलं आहे.
निकाल रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. www.mscepune.in ही परीक्षा परिषदेची यादी आहे. याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्यस्थितीत केला जाणार नाही, असेही कळविण्यात आलं आहे


