एलपीजी ‘गो गॅस’ दरवाढीविरोधात रिक्षा चालकांचा एल्गार; पूर्वीचे दर लागू करण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने एलपीजी ‘गो गॅस’च्या वाढत्या दरांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरात एलपीजी गॅसचे दर दुप्पटपेक्षा जास्त वाढवून सुमारे 100 रुपयांपर्यंत नेण्यात आल्याने रिक्षा चालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, युद्धपूर्वीचा 42 रुपये 50 पैसे प्रति लिटर दर तात्काळ लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी 2026 पूर्वी एलपीजी ‘गो गॅस’चा दर 42.50 रुपये प्रति लिटर होता. मात्र इराण-अमेरिका संघर्षानंतर दररोज दरवाढ होत जाऊन आज ते शंभरी पार गेले आहेत. केंद्र व राज्य सरकार दरवाढ होणार नसल्याचे सांगत असताना गॅस कंपन्या कोणाच्या आदेशाने दरवाढ करत आहेत, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
रिक्षा चालकांचा आरोप आहे की, गॅस दरवाढीसोबतच गॅस भरण्यातही हेराफेरी होत असून, अपेक्षित मायलेज मिळत नाही. त्यामुळे एकीकडे जास्त दर आणि दुसरीकडे कमी अवरेज अशा दुहेरी फटक्यामुळे चालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. दिवसभर मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालकांच्या उपजीविकेवर याचा गंभीर परिणाम होत आहे.
सरकारने तेल व गॅस कंपन्यांवर नियंत्रण ठेवून दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, तसेच वाहनधारकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय रिक्षा चालकांसाठी प्रभावी आणि स्वावलंबी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यासाठी ठोस कायदेशीर तरतुदी कराव्यात, अशीही मागणी संघटनेने केली.
राज्य शासनाने रिक्षा-टॅक्सी कल्याणकारी मंडळाची घोषणा केली असली, तरी त्यासाठी आवश्यक नियम व निधीची तरतूद अद्याप केलेली नाही. तसेच सभासद नोंदणीसाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप करून ही सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश तात्या घुले, उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, सरचिटणीस अशोक औशीकर, लतीफ शेख, गणेश आटोळे, नारीस खान, सुधाकर साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक सहभागी झाले होते.
एलपीजी ‘गो गॅस’ दरवाढीविरोधात अहिल्यानगर शहरात रिक्षा चालकांचा मोर्चा
- Advertisement -


