मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती; सोशल मिडीयावर ओळख, भोंदूबाबाने महिलेसोबत नको ते केलं, भोंदूबाबा फरार

अध्यात्मिक साधना शिकवण्याच्या नावाखाली पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी झिरो नंबर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तेथे आढळून आला नाही.बुधवारी रात्री ‘झिरो नंबर’ने गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तातडीने अटक करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांना तो सापडला नसल्याने आता त्याला फरार होण्यास व मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुणे पोलिसांचे पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झाले असून त्याचा शोध सुरू आहे

दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ऋषिकेश वैद्य याने २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ सांगत आणि महिलेला ‘तू माझी पार्वती आहेस’ असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यात भेटीत लॉजमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच, वसईत पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचेही महिलेने सांगितले असून त्यानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे. २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे

आरोपी ऋषिकेश वैद्य याने केवळ शारीरिक अत्याचारच केले नाहीत, तर पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी धर्माचा आणि अध्यात्माचा आधार घेतला. स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांची दिशाभूल करण्याचा त्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे, गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्यानंतर त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते. या पुराव्यांच्या जोरावर तो २०२५ पर्यंत तिला ब्लॅकमेल करत राहिला.

सध्या आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून, या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहण्याची मागणी होत आहे. तर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. दरम्यान, ऋषिकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलीना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.

लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या ऋषिकेश वैद्य याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. “माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच सत्य बाहेर येईल. सत्यमेव जयते,” अशा आशयाचे वक्तव्य त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles