Monday, February 23, 2026

नगर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ दोन कुटुंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला, दोघे जखमी

तालुक्यातील नारायणडोह व चिंचोडी पाटील या दोन गावांमध्ये रविवारी (22 फेब्रुवारी) पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दोन घरांवर हल्ला करून मारहाण व लूट केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, दोन्ही ठिकाणाहून सुमारे 10 तोळ्यांचा ऐवज चोरीला गेला असल्याचा अंदाज आहे.

साडेबारा ते एकच्या सुमारास दरोडेखोरांनी चिंचोडी पाटील शिवारातील सुदाम पवार यांच्या कुटुंबाला लक्ष केले. अंदाजे पाच दरोडेखारांनी पवार यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या घरातून 50 हजाराची रोकड व सुमारे अडीच तोळ्याचे दागिने चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमी पवार यांच्या जबाबावरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.नारायणडोह शिवारात दोन वाजण्याच्या सुमारास पाच अनोळखी दरोडेखोरांनी साठे कुटुंबाच्या घरावर हल्ला करून मारहाण व लूट केली. या घटनेत पंढरीनाथ मारूती साठे (वय 45) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत त्यांची पत्नी प्रतिभा साठे (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ साठे हे घराबाहेर धान्याजवळ झोपले होते व कुटुंबातील इतर सदस्य घरात झोपले होते. पहाटे दोनच्या सुमारास आरडाओरड ऐकू आल्याने प्रतिभा यांनी बाहेर पाहिले असता पाच इसम पती पंढरीनाथ यांना कोयता, काठ्या, लोखंडी कटावणी व चाकूच्या सहाय्याने मारहाण करत असल्याचे दिसले.

यानंतर दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने घराचा दरवाजा उचकावून आत प्रवेश केला. घरातील महिलांना शिवीगाळ व दमदाटी करून आवाज केला तर जीवे मारू अशी धमकी दिली. गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेतले. तसेच लोखंडी कपाट तोडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. विरोध करणार्‍या सासरे व मुलालाही काठ्यांनी मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी एकूण 2 लाख 17 हजार 500 रूपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, दरोड्याची माहिती तालुका पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरू केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles