राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात शेकडो महिलांना विविध प्रलोभन देऊन फसवण्यात आले असल्याचा आरोप आहे. अत्यंत अश्लील पद्धतीने महिलांचे व्हिडीओ शूट करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी महिला आयोगाने विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
महिला आयोगाची कारवाई
 राज्य महिला आयोग गेल्या चार वर्षांपासून मानवी तस्करी आणि महिलांवरील अन्याय या गंभीर मुद्यांवर काम करत आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माहिती दिली की, खेवलकरांच्या रेव्ह पार्टी प्रकरणात 250–300 पेक्षा अधिक महिलांना आमिष दाखवून फसवण्यात आले. या पार्टीदरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपमधून अत्यंत अश्लील व्हिडीओ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.या धक्कादायक प्रकरणात पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या आधारे पुणे पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत. प्रकरणाचा तपास केवळ वरवर न होता, सखोल व्हावा यासाठीच SIT गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ह्युमन ट्रॅफिकिंगचा मोठा संशय
 महिला आयोगाने व्यक्त केलेल्या शंकेनुसार, या प्रकरणाचा संबंध ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेटशी असू शकतो. रेव्ह पार्टीत आमिष दाखवून आणलेल्या महिलांचा अशा प्रकारे गैरवापर झाला असावा. भविष्यातही अशाच पद्धतीने महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार होऊ नयेत, यासाठी कठोर उपाययोजना होण्याची गरज आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.


