राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटत असून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी पतीची पाठराखण केली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासातून नेमकं काय समोर येणार? याबाबत तर्क लावले जात आहेत.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
रोहिणी खडसेंनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी लवकरच सत्य बाहेर येईल अशा आशयाची पोस्ट केली आहे. “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र”, असं या पोस्टमध्ये रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.
खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ, दारू, हुक्का याचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचाही समावेश आहे. अटक आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. .
‘‘डॉ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद. सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला,’’ अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खराडी परिसरात शनिवारी रात्री गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी स्टे बर्ड अझुर हॉटेलमधील एका खोलीत पार्टी सुरू असून, पार्टीत अमली पदार्थांचा वापर केला जाणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पिंगळे यांनी नमूद केले.


