राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर यातील काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पुन्हा एकदा नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत आहेत. रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाविषयी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रोहित पवार आजही एका सादरीकरणाद्वारे अजित पवारांच्या मृत्यूविषयी नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासासाठी काही महत्त्वाचे खुलासे करत आहेत. यावेळी रोहित पवारांनी म्हटलं की, आम्ही मुंबईत एक छोटं प्रेसजेंटेशन केलं होतं. पण यात जितकं सखोल काम केलं तसं लक्षात आलं की, व्हीएसआर या कंपनीच्या पाठीशी खूप मोठे लोक आहेत. सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे काही लोक या कंपनीच्या पाठीशी आहेत. या अपघातात व्हीएसआर जबाबदार आहे, तर त्यांना वाचवणे कटाचा भाग असू शकतो. नरेंद्र मोदी आणि अमित शाह फक्त हेच अजित पवारांना न्याय देऊ शकतात असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
व्हीएसआर नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे मोठे अधिकारीही यामागे आहेत. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे, कारण यात गुंतलेले इतर लोकही तितकेच प्रभावशाली आहेत. मी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही विनंती करतो की, त्यांनी हा विषय आपल्या हाती घ्यावा आणि नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आम्हाला साथ द्यावी, अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.
मंत्री राम नायडूंनी सुरुवातीलाच लिअर जेटला क्लीन चीट देणारं स्टेटमेंट केलं. नंतर सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली की व्हीएसआर सोबत काही संबंध नाही. ज्यांनी व्हीएसआरला लोन दिलं ते तेलगू देसम पक्षाशी संबंधित आहेत, अशी माहिती देखील रोहित पवारांनी दिली आहे.


