महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीच्या संदर्भात एका मुलाखतीत सूचक भाष्य केलं. मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही मोठं भाष्य करत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका मांडली. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
रोहित पवारांनी काय ट्वीट केलं?
“मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे”, असं सूचक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत अजित पवारांनी काय म्हटलं?
“मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: काम करतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं? हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षांने सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे जे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा’, असं अजित पवार म्हणाले आहेत.


