किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख 49 हजार शेतकर्यांच्या खात्यात 109 कोटी रुपये वर्ग झाले आहेत. या योजनेमुळे शेतकर्यांना मोठा आधार मिळत असून योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने सुरु केलेल्या किसान सन्मान योजनेचा 20 वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. शेतकर्यांसाठी सुरु केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली असून वर्षाला 6 हजार रुपये थेट बँक खात्यात वर्ग होत असल्याने या योजनेचा मोठा दिलासा शेतकर्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील 5 लाख 49 हजार 519 शेतकर्यांच्या खात्यात प्रत्येकाला 2 हजार रुपयांप्रमाणे 109 कोटी 90 लाख रुपये जमा झाले असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले, सद्य परिस्थितीत पेरणीची कामे सुरु असताना अल्पभूधारक शेतकर्यांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरते. यापूर्वी 19 हप्ते शेतकर्यांच्या खात्यात जमा झाल्याने या योजनेबाबत शेतकर्यांमध्ये मोठे समाधान आहे. केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी सुरु केलेल्या अनेक योजनांपैकी किसान सन्मान योजना ही महत्त्वपूर्ण ठरली असून केंद्र सरकारने सुरु केलेल्या सर्व योजना अखंडितपणे सुरु आहेत. योजनांच्या अंमलबजावणीत केंद्र सरकारकडून सातत्य राखले आहे.
अकोले तालुक्यातील 34 हजार 948 शेतकर्यांना 6 कोटी 99 लाख, जामखेड 29 हजार 58 शेतकर्यांना 5 कोटी 81 लाख, कर्जत 43 हजार 610 शेतकर्यांना 8 कोटी 72 लाख , कोपरगाव 29 हजार 640 शेतकर्यांना 5 कोटी 93 लाख, अहिल्यानगर 31 हजार 20 शेतकर्यांना 6 कोटी 20 लाख, नेवासा 54 हजार 289 शेतकर्यांना 10 कोटी 86 लाख, पारनेर 50 हजार 383 शेतकर्यांना 10 कोटी 8 लाख, पाथर्डी 39 हजार 955 शेतकर्यांना 7 कोटी 99 लाख, राहाता 24 हजार 108 शेतकर्यांना 4 कोटी 82 लाख, राहुरी 38 हजार 563 शेतकर्यांना 7 कोटी 71 लाख, संगमनेर 59 हजार 128 शेतकर्यांना 11 कोटी 83 लाख, शेवगाव 41 हजार 901 शेतकर्यांना 8 कोटी 38 लाख, श्रीगोंदा 50 हजार 571 शेतकर्यांना 10 कोटी 11 लाख, श्रीरामपूर 22 हजार 343 शेतकर्यांना 4 कोटी 47 लाख रुपये. अशा रकमा तालुकानिहाय शेतकर्यांच्या खात्यात वर्ग झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


