राहाता : ठिबक, तुषार सिंचन, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण, कांदाचाळ, ट्रॅक्टर व औजारे, शेडनेट, पॉलीहाऊस या बाबीं करीता शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावाचा निधीसाठी पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० कोटी रुपयांचा निधी कृषि विभागास वितरीत केला असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
जिल्ह्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांना ५० कोटी रुपये निधीचे वितरण येत्या आठवड्यात होईल असे सांगून विखे म्हणाले की, जिल्ह्यातील विविध तालुकास्तरीय दौऱ्यावर असताना तसेच जनता दरबार दरम्यान विविध तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कृषि विभागातील प्रलंबित अनुदानाची मागणी सातत्याने केली होती.जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेडनेट, कांदाचाळ, ठिबक सिंचन यासाठी अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव सादर केले होते.मात्र शासनस्तरावर अनुदानाचा निधी जवळपास एक ते दिड वर्षापासून प्रलंबित होता.
विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान प्रलंबित अनुदान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावे म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत बैठक घेवून निधी तातडीने देण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानूसार राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत जिल्ह्याला ५० कोटी रुपये निधी प्राप्त करून घेण्यात यश आल्याचे विखे म्हणाले.
वितरीत होणाऱ्या निधीमधून जिल्ह्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कृषी विभागास वितरीत करण्यात आलेल्या निधीतील ९ हजार ११७ ठिबक व तुषार संच धारक शेतकऱ्यांना ३३ कोटी रुपये, शेततळे अस्तरीकरणातील ८४० शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख रुपये, कांदाचाळ उभारणी करणाऱ्या ९६ शेतकऱ्यांना ९६ लाख रुपये, ट्रॅक्टर व औजारे अनुदानावर खरेदी करणाऱ्या २७१ शेतकऱ्यांना २ कोटी ९५ लाख रुपये, शेडनेट व पॉलीहाऊस उभारणी करणाऱ्या ४० शेतकऱ्यांना ४ कोटी ७८ लाख रुपये असा समावेश आहे.
सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी


