राजकारणावर मतदारांचा दबाव असतो. सिद्धांतहीन राजकारण चालते म्हणून राजकीय पक्षांकडून ते केले जाते. समाजाने नैतिकता जोपासली तर राजकारणही विचारांवर चालेल, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले
‘संघ प्रवासाची १०० वर्षे, नवे क्षितिज’, या विषयावरील व्याख्यानमालेत दुसऱ्या व अखेरच्या दिवशी भागवत यांनी संघ समजून कसा घ्यावा, संघाचा विचार, कार्यपद्धती काय आदी मुद्द्यांवर विवेचन केले.
भाजप, विश्व हिंदू परिषद, अभाविप, मजदूर संघ, किसान संघ या संघप्रणीत संघटना असून संघाचे कार्यकर्ते त्यात आहेत. ते प्रभावीही आहेत. पण त्या संघाच्या शाखा नसून या संघटना स्वायत्त, स्वतंत्र व स्वावलंबी आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र व कार्यपद्धती स्वतंत्र आहे.
. भाजपसह अन्य संस्थांनी आपल्या कार्यातून कमावलेले पुण्य त्यांचे असते, पण पापात मात्र थोडा वाटा आमचा असतो. या संघटनांमध्ये संघातून गेलेले कार्यकर्ते असल्याने पापाचा काही वाटा आमच्याकडे येतो, त्याला काही इलाज नाही. ती आमची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भगवान यांनी यावेळी केले.
राज्यघटनेने दिलेले आरक्षण योग्यच असून अनेक वर्षे अत्याचार सहन केलेल्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे, अशीच संघाची कायम भूमिका राहिली आहे. या समाजाचे पुनरुत्थान करण्यासाठी मदत व सहकार्याची गरज असून इतरांनी थोडा त्याग केला पाहिजे. जेव्हा आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालो आहोत आणि सक्षम झालो आहोत, असे या आरक्षण मिळत असलेल्या वर्गाला वाटेल, आता आरक्षणाची गरज उरलेली नाही, असे त्यांच्याकडून सांगितले जाईल, तोपर्यंत काही वर्षे वाट पाहिली पाहिजे, असेही भागवत यांनी नमूद केले.


