अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आले होते. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेलाही रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्याबाबतही रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ हा ६ वर्षांपूर्वीचा असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच शिवनिका संस्थानातील माझ्या सदस्य पदाचा कार्यकाळ २०२५ मध्येच संपलेला असल्याचंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.“शिवनिका संस्थानात मी सदस्य म्हणून काम केलं आहे. माझ्यासह अनेक मान्यवर देखील त्या संस्थेवर सदस्य होते. मात्र, या संस्थानच्या सदस्यपदाचा माझा कार्यकाळ ८ ऑगस्ट २०२५ रोजीच संपलेला आहे. समाजात जीवन जगत असताना आपण कोणाला ना कोणाला गुरू मानत असतो. खरात पती-पत्नीला माझ्या कुटुंबाने गुरु मानलं, मी गुरु मानलं. त्या ठिकाणी होणारे कार्यक्रम, मग ते महाशिवरात्रीचे असतील किंवा गुरुपौर्णिमेचे असतील, या निमित्ताने आम्ही उपस्थित राहत होतो”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.


