कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या ते त्यांच्या कीर्तनामुळे नव्हे तर दुसऱ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा, ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झाला. संगमनेरमधील वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने हा सोहळा पार पडला. त्यासाठी गाड्यांची वरात, राजेशाही थाट, रथ, झकपक रोषणाई अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्नासाठी कर्ज काढू नका, असा सल्ला कीर्तनातून देणारे इंदुरीकर महाराज यांनी स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्यावर मात्र बक्कळ पैसा खर्च केला. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर आले, व्हिडीओही व्हायरल झाले. ते पाहून लोकांनी हळूहळू त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली, मात्र ट्रोलिंग झाल्यामुळे नाराज झालेल्या इंदुरीकर महाराजांनी नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला.मात्र आता त्यांच्या या भाष्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेl. रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट लिहीत इंदुरीकर महाराज यांना ‘फेटा खाली ठेवायचा नाही ‘ असा संदेश दिला आहे. विकृत छपरी लोकांकडे लक्ष देऊ नका, अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी लेक म्हणून विनंती आहे, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
फेसबूकवरील अधिकृत अकाऊंटवरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी संदेश लिहीला आहे. त्यांची पोस्ट जशीच्या तशी…
” इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झाला साहजिकच होणार पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत यांच्या कडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन,भजनातून समाजातील माता,भगिनी,बंधू साठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे.अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे.त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका. तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री,पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे त्यांना सदबुद्धी,चांगले विचार,चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी,विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत.त्यांची विकृती ठेचून काढू अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही.ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही.”


