छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सदानंद डोखे तर व्हा.चेअरमनपदी नवनाथ गोरे यांची निवड
नगर – अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सदानंद डोखे तर व्हा.चेअरमन पदी नवनाथ गोरे यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. तर मानद सचिवपदी श्रीमती अर्चना गुंड यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी नगर तालुका उपनिबंधक श्रीमती शुभांगी गौंड व सहाय्यक एस.यु.बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेत चेअरमन पदी सदानंद डोखे व व्हा.चेअरमन नवनाथ गोरे तसेच मानद सचिवपदी श्रीमती अर्चना गुंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बोलतांना नुतन चेअरमन सदानंद डोखे म्हणाले की, संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्व सभासदांचा आणि संचालक मंडळाचा मन:पूर्वक आभारी आहे. ही केवळ एक पदाची निवड नसून, ही माझ्यावर टाकलेली जबाबदारी आणि विश्वासाची पावती आहे. सहकारी चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. आपली संस्था अनेक वर्षांपासून पारदर्शक, प्रामाणिक आणि विश्वासार्ह कामगिरी करत आहे.या पुढील काळात सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आणि संस्थेचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी मी आणि माझे सहकारी पूर्ण ताकदीनिशी कार्य करू. नव्या योजनांची अंमलबजावणी, सभासदांच्या गरजा आणि मागण्या लक्षात घेऊन कार्य करणे हे माझे प्रमुख ध्येय असेल. आपण सर्वांनी जे प्रेम व पाठबळ दिले, त्यातूनच ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्याची प्रेरणा मिळते.
व्हा.चेअरमन नवनाथ गोरे म्हणालेकी, मी या पदाची जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार असून, संस्थेच्या हितासाठी काम करण्याचा माझा कटाक्ष राहील. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार, हेच माझे कार्यधोरण असेल. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उपक्रम राबवले जातील. अधिकाधिक सुलभ सेवा, कर्जसुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवत विश्वासार्हता वाढवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सचिव श्रीमती अर्चना गुंड म्हणाल्या की, माझ्या या निवडीमागे ज्यांनी विश्वास दाखवला, त्या सर्व संचालक मंडळाचे मी मन:पूर्वक आभार मानते. ही निवड म्हणजे सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. सभासदांचा विश्वास टिकवण्यासाठी मी झपाटून काम करणार आहे. सहकार चळवळीला नवी दिशा देण्यासाठी नेतृत्वाची गरज असून, त्या दिशेने पावले उचलली जातील. संस्थेचा प्रत्येक निर्णय हा सभासदांच्या हिताचा व विकासाचा असेल, हे मी हमखास सांगते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी ज्ञानेश्वर सुर्वे, दिलीप वारकड, संतोष थिगळे, श्रीकांत साळे, राजेश तगरे, संतोष साबळे, गोटीराम मडके, रवि देशमुख, प्रशांत सातपुते, प्रताप साबळे, हरिष भालेराव, ज्ञानदेव अडसुरे, श्रीमती सुरेखा लांडगे, किशोर जेजुरकर, संतोष खंडागळे आदी संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन संचालक किशोर जेजुरकर यांनी केले व पतसंस्थेची माहिती सादर केली.


