पारनेर तालुक्यातील देसवडे गावच्या शिवारात अवैध वाळू उत्खनन आणि चोरटी वाहतुकीविरुद्ध कारवाई करणाऱ्या सरकारी पथकावर एका वाळू तस्कर आरोपीने चक्क डंपर अंगावर घालून जिवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पारनेर पोलिस ठाण्यात विशाल बाबाजी तळेकर (रा. वासुंदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पथकातील एका कर्मचाऱ्याला अपहरण करून त्याचा मोबाइल फोडण्यात आला असून, पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा पद्धतीने वाळू उत्खनन केल्याचा आरोपही आहे.
घटनेच्या माहितीनुसार, अशोक भाऊसाहेब डोळस (वय ५७, मंडळ अधिकारी, पळशी) हे पारनेर महसूल विभागात गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरटी वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात पथक नेमण्यात आले आहे. या पथकात डोळस यांच्यासह एस. आर. काळे (ग्राम महसूल अधिकारी, लोणी हवेली), आर. आर. खरमाळे (रांधा), ए. डी. जगताप (चांभूत), एस. सी. पवार (सिद्धेश्वरवाडी) आणि एन. के. पवार (पळशी) यांचा समावेश होता. हे पथक २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता पारनेर तहसील कार्यालयातून निघाले आणि देसवडे गावच्या भागात पेट्रोलिंग करत होते.रात्री ११:४५ वाजता देसवडे शिवारातील मुळा नदीपात्राजवळ खंडोबा मंदिराच्या लगत एक पांढरा रंगाचा नंबर प्लेट नसलेला डंपर वाळूने भरलेला आढळला. पथक जवळ येताच दोन व्यक्ती झाडीत पळून गेल्या. त्यानंतर एक पांढरी क्रेटा कार (एमएच १४ जीएच ९२७७) तेथे आली. त्यातून उतरलेला व्यक्ती विशाल तळेकर असल्याचे डोळस यांनी ओळखले. डंपर वॉशिंग पॉइंटवर असल्याने हे अवैध उत्खनन असल्याची खात्री पटली. पथकाने पंचनामा करून वाहने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तळेकरने सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि माझी वाहने नेऊ नका असे म्हणून अडथळा निर्माण केला.
पोलिस मदत बोलावल्याचे सांगताच तळेकरने डंपर सुरू केला. पथकातील संकेत चंद्रकांत पवार हे डंपर थांबवण्यासाठी क्लिनर सीटवर बसले. याचा राग येऊन तळेकरने तुम्ही माझ्या गाडीत माणूस बसवला म्हणून मी पळू शकणार नाही? थांबा, मी तुम्हा एकेकाला गाडीखाली चिरडून मारतो अशी धमकी दिली. पथकातील सदस्य डंपरसमोर उभे असतानाही त्याने जोरात डंपर चालवून अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि पवार यांना घेऊन निघून गेला.
पथकाने पवार यांचा शोध घेतला असता, घटनास्थळापासून ४ किलोमीटर अंतरावर पोखरी गावच्या शिवारात ते रस्त्यावर सापडले. पवार यांनी सांगितले की, तळेकरने त्यांचा मोबाइल रस्त्यावर आपटून फोडला आणि वाळू रस्त्यावर टाकून धमकावून खाली उतरवले. पथक परत घटनास्थळी आले असता क्रेटा कार तेथे उभी होती. त्याचा पंचनामा करून ती ताब्यात घेण्यात आली.डोळस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तळेकरने पर्यावरणाला हानी पोहोचेल असे नदीपात्रातील वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक केली. सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, धक्काबुक्की, हल्ला आणि अपहरणासारखे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी अधिक कडक कारवाईची मागणी होत आहे.


