जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय कडूस व व्हा. चेअरमनपदी अर्जुन मंडलिक यांची निवड
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय सुदाम कडूस व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन दिगंबर मंडलिक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळची सभा शनिवारी (दि.३१ जानेवारी) संस्थेच्या कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत चेअरमन पदासाठी संजय कडूस यांच्या नावाची सूचना संचालक प्रशांत मोरे यांनी मांडली. सदर सूचनेस कैलास डावरे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी अर्जुन मंडलिक यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब चांदणे यांनी मांडली. सदर सूचनेस दिलीप डांगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकाऱ्यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नूतन चेअरमन संजय कडूस म्हणाले की जय श्री गणेश पॅनलने निवडणुकीच्या वेळी सभासदाना दिलेल्या आश्वासनाची १०० टक्के पूर्तता करण्याचे काम हे संचालक मंडळ करत आहे. संस्थेचे आर्थिक हित व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून सहकारी संचालक व सभासदांच्या सहकार्याने विविध योजना राबविण्यात येतील. संस्थेचा लौकिक या पुढील काळात अधिक वाढविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले. व्हा. चेअरमन अर्जुन मंडलिक यांनी सर्व सहकारी संचालकांचे आभार मानून सभासदांच्या हिताचे निर्णय घेवू असे सांगितले.
सदर प्रसंगी संस्थेच्या मावळत्या चेअरमन सुरेखा महारनूर, मावळते व्हा.चेअरमन श्रीकांत देशमाने, संचालक विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, राजू दिघे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, काशिनाथ नरोडे, योगेंद्र पालवे, मनिषा साळवे, अभिजित पवार, चेतन चव्हाण, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे, संस्थेचे सभासद सुजाता भांडवलकर व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.


