उद्धव ठाकरेंनी संदेश दिलाय की, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. तुम्ही कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. चार भिंतीमध्ये आपण बोलू शकतो. पण, हा नवीन प्रवाह सुरू होत आहे. तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे, ही आतापर्यंत लोक भावना आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यक्त केली. दोघांनीही आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात, तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. काही लोकांना त्याविषयी वेदना होणार आहे. कारण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल. कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीच या विषयावर बोलावं, असे तुम्ही म्हणतात. पण, दुसऱ्या काळातील नेते यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षात अशा प्रकारचं कोणी काहीही वक्तव्य केलेलं नाही. आमच्या भावना फार स्वच्छ आहेत. याबाबतीत आमचं मन निर्मळ आहे. त्यामुळे आम्ही असे ठरवले आहे की, कोणी काहीही बोलू द्या, भूतकाळात वळायचं नाही, हा फॉर्म्युला आहे. उद्धव ठाकरेंनी ठरवलंय की, एक पाऊल पुढे टाकायचे आहे. एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचे आहे. मागे आम्ही काय बोललो? ते काय बोलले? त्यांनी काय टीका केली? त्यांनी काय भूमिका मांडली? हे विसरायला हवे याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात.


