श्रीरामपूर: भैरवनाथनगर ग्रामपंचातीमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून लाखोंचा अपहार केला असून एलएडी लाईट न बसवताच सुमारे 2 लाख 67 हजार रुपयांचे बील ठेकेदाराच्या नावने अदा केल्याचे दाखविले असल्याचा आरोप माजी सरपंच रुख्मिनी देवकर यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 15 व्या वित्त आयोगाच्या फंडातून भैरवनाथ नगर ग्रामपंचयत शेळके-जाधव वस्ती, ढोकळ वस्ती, लबडे वस्ती, दुर्गानगर, सम्राटनगर, कदम वस्ती, फरगडे वस्ती या ठिकाणी एलएडी सेंब्ली बसविण्यासाठी जानेवारी 2025 मध्ये विघ्नहर्ता एंटरप्रायजेस या फर्मला काम देण्यात आले.एका एलएडीची किंमत बाजारात सुमारे 500 ते 600 रूपयांपेक्षा जास्त नाही. मात्र सरपंच व ग्रामसेवकांनी या एका एलएडीची किंमत 1780 रूपये लावली. व्हिजन कंपनीचे 150 एलएडी खरेदी केल्याचे दाखविण्यात आले.
मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायतीने ठरलेल्या ठिकाणी कुठेही एलएडी बसविले नाही. सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून 22 जानेवारी 2025 रोजी सुमारे 2 लाख 67 हजार रुपयांचे बील विघ्नहर्ता एन्टरप्रायजेसच्या नावे काढले, असा आरोप रूख्मिणी देवकर, वसंत देवकर, अलका भाऊसाहेब वायकर, सौरभ गवारे आदींनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई केली जावी, यासाठी गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, जिल्हा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे तक्रार केली असून, कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देवकर यांनी केला आहे.


