Saturday, February 21, 2026

सातबारा उतारा अधिक सोपा होणार, कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या सूचना

सातबारा उताऱ्यावरील ‘अपाक शेरा’, ‘एकुमॅ (एकत्र कुटुंब मॅनेजर) नोंद’, ‘तगाई कर्ज’, बंडिंग कर्ज’, ‘भूसुधार कर’, ‘इतर पोकळीस्त’ अशा कालबाह्य नोंदी आता कमी होणार आहेत. त्यामुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होणार असून, समजण्यास सोपा होणार आहे.

सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन मोबदला आदी कामकाजावेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. या सर्व पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यावरील अशा नोंदी कमी करण्याची मोहीम राबविण्याची सूचना महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना दिली. याबाबतचे आदेश महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी प्रतापसिंह खरात यांनी काढले आहेत.

राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिवंत सातबारा उतारा ही मोहीम यापूर्वीच राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करून सातबारा उतारा अद्ययावत करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यावर त्या-त्या काळात अनेक नोंदी घेण्यात आल्या.

आता कालानुरूप या नोंदी कमी करण्यासाठी तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागते. या प्रक्रियेसाठी दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. या मोहिमेमुळे साताबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी आता शासन स्वतः:हून कमी करणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. कालबाह्य नोंदी कमी करताना कायदेशीर बाबी समजावून सांगाव्यात, यासाठी महसूल अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बहिणींना हक्क मिळणार…

हिंदू वारसा कायद्यातील तरतुदीनुसार (१९५६) वडिलोपार्जित मिळकतीत वडिलांच्या निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात. त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नावे, इतर अधिकार सदरी न घेता भोगवटादार सदरी येणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सर्व वारस नोंदींची खात्री करावी. इतर अधिकार सदरी असलेली महिला वारसांची नावे वाजवी दुरुस्तीची कार्यवाही करून भोगवटादार सदरी घ्यावीत, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
ही कामे होणार…

अपाक शेरा कमी करणे, एकुमॅ, तगाई कर्जाच्या नोंदी, नजर गहाण, सावकारी कर्ज, सावकारी अवॉर्ड, भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार कजापचा प्रलंबित अंमल सातबारा उताऱ्यावर घेणे, पोट खराब नोंदी घेणे, नियंत्रित सत्ता प्रकार, शेरे प्रकारनिहाय पडताळणी करून सातबारा उताऱ्यावर अंमल घेणे, भोगवटादार वर्ग-१ व भोगवटादार वर्ग-२ असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकारनिहाय सातबारा उतारा तयार करणे, गावातील सार्वजनिक जागा, जसे की स्मशानभूमी, रस्ते, पाणीपुरवठा यांच्या नोंदी घेणे.

काय फायदा होणार…

सातबारा उतारा समजण्यास सोपा होणार

अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे मालकी हक्कासंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार

शासकीय योजना आणि विकास कामांसाठी जमिनीची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार

शेतकऱ्यांना मोबदला अथवा कर्ज मिळण्यास अधिक सोपे होणार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles