Thursday, October 30, 2025

हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना

हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही;

प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना

अहिल्यानगर, दि. ३० : हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे.

ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील.

या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील भागांमध्ये उतरू शकतात.

महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, ती हलवू नयेत, उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. त्या पॅकेजवर दिलेल्या पत्त्यावर त्वरित माहिती द्यावी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याला व प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपकरणे सुरक्षित असली तरी त्यामध्ये संवेदनशील वैज्ञानिक साधने असल्याने छेडछाड झाल्यास माहिती नष्ट होऊ शकते.

संशोधन संस्था अशा उपकरणांची माहिती दिलेल्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची भरपाई देणार आहे. या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles