Friday, February 20, 2026

‘गुगल मॅप’वर शोधायचे लोकेशन अन् फोडायचे सब स्टेशन ;अहिल्यानगर एलसीबीकडून आंतरराज्यीय टोळी जेरबंद

अहिल्यानगर-जिल्ह्यात वाढत्या कॉपर चोरीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यिय टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ‘गुगल मॅप’वर एमएसईबी सब-स्टेशनची लोकेशन्स शोधून योजनाबध्द पध्दतीने कॉपर चोरी करणार्‍या या टोळीचा भांडाफोड करण्यात आला असून 4 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.बबलू उर्फ हुसेन रेहमत खान (वय 38), समीम कमरअली खान (वय 32, दोघे, रा. विदीशा, मध्यप्रदेश), शकील लईस खान (वय 32, रा. भोपाळ, मध्यप्रदेश), कासीम इदरीस खान (वय 30, रा. सिरोज, विदीशा, मध्यप्रदेश) व शाहरूख साबीर खान (वय 23, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) अशी जेरबंद केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 4 नोव्हेंबर 2025 रोजी 132 के.व्ही. उपकेंद्र खांडके, पिंपळगाव लांडगा (ता. अहिल्यानगर) येथून कॉपर पाईप व बेल्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद अरविंद एकनाथ बडे (वय 53, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला.

जिल्ह्यात या प्रकारच्या कॉपर चोरीचे प्रकार वाढू लागल्याने पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाची विशेष जबाबदारी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सलग आठ दिवस तपास करत होते. पथकाने सर्व चोरींच्या घटनास्थळांना भेट देऊन माहिती संकलित केली तसेच अशा गुन्ह्यांच्या पध्दतीचा अभ्यास करून संशयित व्यक्तींचा शोध घेतला. 24 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मध्यप्रदेशातील पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी चक्क गुगल मॅपवर सब-स्टेशनची लोकेशन शोधून नंतर दोन दिवस पाहणी करून, रात्री किंवा पहाटेच्या सुमारास चोरी करत असल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली कार (एमएच 13 टीए 4320), चोरीस गेलेले एक लाख 40 हजाराचे कॉपर पोल असा एकुण चार लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील संशयित आरोपींना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.हे संशयित आरोपी खास कॉपर चोरीच्या उद्देशानेच महाराष्ट्रात येत असल्याचेही समोर आले. या टोळीने अहिल्यानगर तालुक्यातील खांडके, 220 के. व्ही. कौडगाव, तसेच जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, सिन्नर (नाशिक ग्रामीण), पारगाव (पुणे ग्रामीण) येथील सब-स्टेशन्स फोडून कॉपर चोरी केल्याची कबूली दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles