गावे उभे करण्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पाठबळ महत्वाचे : पद्मश्री पोपटराव पवार
जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा
नगर : गावांच्या सर्वांगीण विकासात जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. चांगले संवेदनशील अधिकारी लाभले तर गावांचा कायापालट नक्कीच होवू शकतो. गावे उभे करण्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पाठबळ हवे असते. सन 2047 च्या भारतासाठी निर्व्यसनी, निरोगी तरुणाई आवश्यक आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केले पाहिजे. कुटुंब, गाव, राष्ट्र निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषदा आहेत. संभाजीराव लांगोरे यांनी 33 वर्षांच्या आपल्या सेवेत अतिशय समर्पण भावनेने काम करीत ठसा उमटवला. सेवानिवृत्तीनंतही ते अनुभवाचा उपयोग समाजासाठी करत राहतील, असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. संभाजीराव लांगोरे यांचा सौ.शैलजा लांगोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचय माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, माजी आ.दादाभाऊ कळमकर, माजी जि.प.सदस्य सचिन जगताप, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चअरमन राजेंद्र नागवडे, सुभाष शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच लांगोरे यांचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होता.
शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, लांगोरे ग्रामीण भागातून पुढे आल्याने त्यांना गावांच्या समस्यांची पूर्ण जाणीव होती. विविध जिल्ह्यात काम करताना त्यांनी अतिशय निष्ठेने कर्तव्य बजावत ग्रामविकासात योगदान दिले. सक्षम अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास ग्रामविकास साध्य होण्यास मदत होते. लांगोरे सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी आहे. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी ते नक्कीच मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे.
जिल्हाधिकारी डॉ.आशिया म्हणाले की, लांगोरे यांनी विविध पदांवर काम करताना ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनुभवाचा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत चांगला फायदा झाला. सेवानिवृत्तीनंतर ते आता परिवाराला अधिक वेळ देवू शकतील. सेवेत असताना अधिकाऱ्यांना अनेक वेळा कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. याशिवाय लांगोरे यांनी आपल्या अनुभवाचा फायदा ग्राम विकासासाठी होईल यादृष्टीनेही प्रयत्न करावेत.
सीईओ आनंद भंडारी म्हणाले, बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर येथे सेवा देणाऱ्या लांगोरे यांना आपल्या कारकिर्दीचा आज निश्चितच अभिमान वाटत असेल. शांत, संयमी, मितभाषी असलेल्या लांगोरे यांचे आपल्या कामावर अतिशय प्रेम होते. त्यांच्यासोबत मी पुण्यातही एकत्रित काम केले आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सेवानिवृत्तनंतरचे त्यांचे आयुष्य आरोग्य संपन्न असेल आणि समाजासाठी ते योगदान देणे चालूच ठेवतील असा विश्वास आहे. यावेळी राजेंद्र नागवडे यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत लांगोरे यांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना लांगोरे म्हणाले, स्वत:च्याच अहिल्यानगर जिल्ह्यात सेवानिवृत्ती झाली यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. प्रशासनात काम करताना अनेक चांगले, वाईट अनुभव नक्कीच आले. मी कायम प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यावर भर दिला. यात सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांची साथ मिळाली. कुटुंबानेही कायम साथ दिल्याने समाधानाने शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे.
 या कार्यक्रमासाठी सागर भंडारी, युवराज ढेरे,अभय गट,प्रथमेश पवार ,महेश माडावी,योगेश डेरे ,अल्ताफ सय्यद ,विश्वास रोहोकले,शांताराम मिसळ ,,शिवाजी बेल्हेकर सागर रक्षे ,संभाजी साठे आदींसह जिल्हा परिषद अंतर्गत विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी केले.सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


