माजी आमदार शहाजी बापू पाटील () यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री काळातील कामाचे कौतुक करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. गत विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांना पराभवाचा फटका बसला, दुसरीकडे राज्यात महायुतीचं सरकार आले, पण एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. त्यावरुन, शहाजी पाटील यांनी सोलापुरात जोरदार फटकेबाजी केली. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पराभवाचे दु:ख व्यक्त करताना वेगळंच लॉजिक मांडल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, मी निवडून यायला पाहिजे होते. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.
गंगेचा उगम पवित्र आहे, कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून आला. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंपासून तिचा उगम आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे पडली.सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात पक्षाची सूत्र दुसऱ्यांकडे गेली, त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाली. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी आपली लढाई आहे. तुम्ही आम्ही जसे मावळे आहोत, तसेच मावळे त्यावेळी पानिपतला जाणारे होते. राज्याच्या कानकोपऱ्यात लोक म्हणतात, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल लागला. पवार साहेबांसारख्या माणसाचे केवळ 10 लोक निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंचं कौतुक करत शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.


