शनिशिंगणापूर येथे दीर्घकाळ सेवा देणारे पुजार्यांना देवस्थानमध्ये मानधनावर घेण्यासंबंधीच्या अर्जावर विचारविनिमय होऊन विश्वस्त मंडळाने घेतलेल्या बैठकीत निर्णय होऊन पुजार्यांना पगारी नोकरीवर घेतल्याची माहिती मिळाली आहे.
देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत देवस्थान पुजार्यांना नियम अटी घालून मानधनावर सेवेत घेण्याचे ठरले आहे. पुजार्यांना 31 हजार व 21 हजार मासिक मानधन देण्याचे ठरले असून, पहाटे 4 ते रात्री 10.30 या कालावधीत दोन शिफ्टमध्ये पुजार्यांनी सेवा द्यायची आहे. पुजार्यांनी भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारायची नाही. एवढे करूनही भाविक पुजार्यांना दक्षिणा देत असतील, तर ते पुजार्यांनी न स्वीकारता ती रक्कम तेथील दानपात्रात टाकण्यासंबंधी भाविकांना मार्गदर्शन करावे. भक्त पुजार्यास वस्तू स्वरूपात दान देणार असेल, तर त्या वस्तू पुजार्याने न स्वीकारता देवस्थानच्या देणगी विभागाकडे जमा करून त्याची रितसर वस्तू स्वरूपाने पावती घेण्यासाठी भाविकांना मार्गदर्शन करावे.
हवनासाठी पूजेचे सामान, पुजारी दक्षिणा व देवस्थानकडील चार्जेस मिळून देवस्थान 11 हजार रुपये पावती हवन पूजेसाठी भक्तांकडून घेणार आहे. त्यापैकी पूजेचे सामान व पुजारी दक्षिणा मिळून 5 हजार रुपये रक्कम पुजार्यास देवस्थानकडून स्वतंत्रपणे देणार आहे. पुजार्यास ड्युटीवर असताना मोबाईल बाळगणे व वापरावर बंदी राहील.
1 हजार रुपये पुढील देणगीदाराकडून अभिषेकासाठी देवस्थानचे अभिषेक शुल्क आकारले जाणार नाही. परिसरातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांना अभिषेकासाठी देवस्थानचे शुल्क आकारले जाणार नाही. परंतु इतर सर्व भाविकांनी अभिषेकासाठी देवस्थानची 100 रुपयांची पावती घेऊनच अभिषेक करायचा आहे. याप्रमाणे देवस्थानतर्फे निर्णय घेण्यात आले असून, शनिवार (दि. 6) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.


