शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील, अशी चर्चा आहे आणि तसे संकेतही त्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल. आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि उबाठा गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दोघे भाऊ एकत्र येऊन आपआपल्या पक्षाची ताकद दाखवतील. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं समीकरण बघायला मिळेल.”
शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातलही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे. मला याची कॉपी मिळाली आहे. सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे आणि हे घातक नक्कीच आहे. विखेंच्या समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. दुसरीकडे, बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल. राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल. हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे. कटुता इतकी निर्माण झाली आहे की, एकमेकांच्या व्यवसायाकडे लोक जात नाहीत. हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.


