‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबतही स्थानिक पातळीवर युती- आघाडी करा, पण भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका’; असं थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. बीडमधील आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. लवकरच निवडणुका जाहीर होतील. याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतंच पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी भाजपसोबत युती – आघाडी न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
शरद पवार यांच्या या आवाहनानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मस्के यांनी शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची माहिती दिली. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आपआपल्या परीनं युती करावी. मात्र, भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नये’, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं, असं मस्के यांनी सांगितलं.
दरम्यान, शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचनांमध्ये केवळ भाजप पक्षालाच विरोध केला आहे. इतर पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही. त्यामुळे भविष्यात शरद पवार गटाची अजित पवार गटासोबत युती होईल का? अशी चर्चा सुरू आहे.


