मेंढपाळांची मुले गिरवतात जर्मन भाषेचे धडे
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचेकडून शिक्षक सचिन ठाणगे यांचा गौरव
नगर – पारनेर तालुक्यातील धोत्रे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सचिन ठाणगे यांच्या संकल्पनेतून धोत्रे खुर्द शाळेतील विद्यार्थी जर्मन भाषा शिकून तिचे वाचन आणि लेखन करण्याची आवड जोपासत आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना वेगळी वाट शोधता यावी, यासाठी ग्रामीण भागातील मुलांना जर्मन भाषा शिकविण्याच्या संकल्पनेतून भविष्यवेधी बहुभाषीक शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेत होत आहे.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि इतर देशांमधे त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जर्मन देशातील ‘बाडेन बुटेनबर्ग’ या राज्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत नुकताच सामंजस्य करार केला आहे . जर्मन भाषेच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, परंतु भाषेचे ज्ञान अवगत नसल्यामुळे अनेक भारतीय मुलांना संधी मिळत नाही.
मुले संख्याचे वाचन व लेखन, स्वतःबद्दल माहिती,आपसात संभाषण या क्रिया जर्मन भाषेत करतात. शालेय अभ्यासाबरोबरच मुले जर्मन भाषेचा अभ्यास आवडीने करत आहेत.
अतिशय दुर्गम भागातील मेंढपाळांच्या मुलांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जर्मन भाषेचे ज्ञान दिले . त्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक सचिन ठाणगे यांचे कौतुक केले.
मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाषा शिकवल्या तर त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होते. हा बहुभाषिक प्रकल्प राज्याला दिशादर्शक असल्याचे मत दादा भुसे यांनी व्यक्त केले .
ग्रामीण भागातील तिसरीच्या मुलांनी जर्मन भाषा अवगत करणे ही खूप विशेष बाब आहे , या आगोदरही ठाणगे यांनी मुलांना मोडी लिपीचे ज्ञान दिले आहे, असे उपक्रमशील शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे मत जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,गटशिक्षणाधिकारी सिमाताई राणे, लेखाधिकारी रमेश कासार, विस्तार अधिकारी कांतिलाल ढवळे, जयश्री कार्ले, केंद्रप्रमुख उत्तम फंड व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.


