Thursday, October 30, 2025

नगर शहरात मनपा निवडणुकीसाठी वोट चोरी पेक्षाही भयानक षडयंत्र शिवसेनेचा आरोप ; आयुक्त डांगेंना धरले धारेवर

मनपा निवडणुकीसाठी वोट चोरी पेक्षाही भयानक षडयंत्र – ठाकरे शिवसेनेचा आरोप ;

सुनवणी वेळी शहरप्रमुख काळेंनी आयुक्त डांगेंना धरले धारेवर

प्रतिनिधी : मनपा निवडणूक करिता प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून १५ सप्टेंबर पर्यंत हरकती, सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी सर्व प्रभागांमध्ये मिळून एकूण १४ हरकती घेतल्या होत्या. आज सकाळी जिल्हाधिकारी यांच्यासमोर हरकतींची सुनावणी सुरू असताना मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद नद्या, नाले, रेल्वे पूल, रस्ते यांना न ओलांडण्याच्या सूचना असताना देखील सत्ताधाऱ्यांना लाभ होईल अशाप्रकारे रचना केल्याचा जोरदार युक्तिवाद पुराव्यांसह हरकत मांडत ठाकरे सेनेने केला. यावेळी अधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यां समोरच काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी डांगे निरुत्तर झाले. सत्तेचा गैरवापर करून मनपा निवडणुक रडीचा डाव खेळत जिंकण्यासाठी वोट चोरी पेक्षाही भयानक षडयंत्र सत्ताधारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून रचले असल्याचा गंभीर आरोप सुनावणी नंतर काळे यांनी केला आहे.

सन २०१८ च्या रचनेतील प्रभाग ७ मधील नागापूर गावठाण नव्या रचनेमध्ये प्रभाग १ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सुमारे २२०० ते २४०० मतदान यामध्ये वळवण्यात आले आहे. यावर काळेंनी जोरदार युक्तिवाद करताना म्हटले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नद्या न ओलांडण्याच्या सूचना असताना देखील अशी कोणती अपरिहार्यता निर्माण झाली की नदी ओलांडून नागापूर गावठाण प्रभाग १ मध्ये समाविष्ट केले ? त्यावर आयुक्त डांगे यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, आम्ही नगर मनमाड रस्ता हा निकष पकडला. यावर संतप्त होत काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग १७ मध्ये रेल्वे रूळ, रेल्वे फ्लाय ओव्हर, नगर दौंड रोड ओलांडला गेला, प्रभाग १३ मध्ये उड्डाणपूल, तर प्रभाग ५ मध्ये नगर मनमाड रोड, पत्रकार चौक ते डीएसपी चौक रोड नगर छत्रपती संभाजी नगर रोड ओलांडले गेले हे निदर्शनास आणून दिले. काळे म्हणाले तेही बेकायदेशीरच होते. तिथे नियम धाब्यावर बसवता आणि प्रभाग १ मध्ये नगर मनमाड रोड निकषात पकडल्याचे सांगता, असे खडे बोल यावेळी काळे यांनी आयुक्तांना सुनावले. यावेळी अधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी आयुक्त हे शहराच्या लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने खुर्चीवर विराजमान झाले आहेत. प्रभाग १ मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत. त्यांची राजकीय सोय करण्यासाठी हा विशेष फेवर आयुक्तांनी राजकीय संगनमत आणि दबावातून केल्याचा आरोप केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काळे यांना रोखले. मात्र काळे यांनी प्रभाग १ आणि ८ मधील नागरिकांना न्याय देण्याची मागणी लावून धरली.

अधिकाऱ्यांनी यावेळी प्रभाग ८ ची लोकसंख्या १९,८१२ असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रभाग १ मध्ये भाग समाविष्ट केल्याचे दुसरे उत्तर दिले. त्यावर जोरदार हरकत घेत शासनाच्या निकषां प्रमाणे एका प्रभागात २२,४३७ लोकसंख्ये पर्यंत समावेश करता येऊ शकत असताना देखील राजकीय दबावातून नागापूर गावठाण हलविण्यात आल्याचा आक्षेप घेतला. याच बरोबर काळे यांनी सन २०१८ च्या रचनेतील ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या
प्रभाग ७, ८, १०, १२, १३, १५, १६ यांची मोडतोड करण्यात आल्या बाबत देखील आक्षेप घेतला.

सर्वच प्रभागांमध्ये मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाला विशेष टारगेट केल्याचा आरोप यावेळी ठाकरे शिवसेनेने केला. निवडणूक आयोग पारदर्शक आणि मुक्त वातावरणात व्हायला हव्यात. मात्र निवडणूक आयोग, प्रशासन हे भारतीय संविधान धाब्यावर बसवून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी ही सत्ताधाऱ्यांच्या राजकीय लाभाची करून नागरिकांना मात्र वेठीस धरत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेने केला आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यां समोर युक्तिवाद करत असताना किरण काळे म्हणाले, अधिकारी तीन वर्षानंतर बदली होऊन निघून जातील. अधिकाऱ्यांना काय फरक पडतो ? पण या शहराच्या आमच्या नागरिकांना संपूर्ण आयुष्य या शहरात व्यथित करायचा आहे. राजकीय दबावातून प्रभागांची अशाप्रकारे मोडतोड करून तुम्ही नगरकरांना वेठीस का धरता असा संतप्त सवाल यावेळी काळेंनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles