शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. त्यांनी म्हटलंय की, उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार सोडले, तर उर्वरित सर्व आमदार शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत.अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत, असा दावा देखील कृपाल तुमाने यांनी केलाय. दसरा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस असतो आणि याच दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या घोषणा झाल्या आहेत. यावेळीही दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत देखील कृपाल तुमाने यांनी दिले आहेत.
दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी या प्रकारचा आमदारांचा ओघ हा राजकीय समीकरणं बदलणारा ठरू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आधीच आव्हानात्मक परिस्थितीत आहे, आणि अशा वेळी आणखी आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले तर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.


