उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मोठं राजकीय समीकरण बदललं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे भाजपला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राजकीय निर्णय घेतला आहे. उल्हासनगर शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेनेने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. भाजपचा कट्टर विरोधक अर्थात टीम कलानी गटासोबत शिवसेना शिंदे गटाने युतीची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.
या दोस्ती का गठबंधनच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी तसेच त्यांच्या सदस्यांमा पेढा भरवून आनंद व्यक्त केला आहे.
आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम कलानीच्या तब्बल १५ नगरसेवकांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी ओमी कलानी म्हणाले, ‘हि महायुती झालेली आहे, कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असा काही शिवसेनेचा आणि खासदारांचा विचार नाही, फक्त शहराचा विकास अधिक प्रमाणात व्हावा, ती सर्व शहरवासीयांची मागणी आहे, त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत’, असं ते म्हणाले.
राज्यात सत्तेत असूनही शिवसेना–भाजप युतीचा उल्हासनगरात अद्याप निर्णय नाही. अशावेळी कलानी गटासोबतची युती जाहीर करून शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. कलानी कुटुंबाचे शहरातील वर्चस्व लक्षात घेता, शिवसेना आता त्यांची ताकद आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या नव्या समीकरणामुळे भाजपला राजकीय फटका बसणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.