नगर तालुक्यातील गद्दारांना निवडणुकीत जागा दाखवू : शशिकांत गाडे
: सगळे पदे देऊन कारले गद्दार ठेवले
: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरच निवृत्ती घेईन
नगर : नगर तालुक्यातील चार-पाच लोकांनीच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेसह चाळीस आमदार सोडून गेले तेव्हा ठाकरे सेनेला काही फरक पडला नाही. तर तालुक्यातील पाच लोक ठाकरे गटाला सोडून गेल्याने काहीच फरक पडत नाही. उलट येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या गद्दारांना जागा दाखवून देऊ असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नामोल्लेख टाळत संदेश कारले यांच्यावर केला.
नगर तालुक्यातील ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर यांसह पाच लोकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे . या पार्श्वभूमीवर आज यश ग्रँड येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी गाडे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.
याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव माजी सभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड गोविंद मोकाटे पोपट निमसे रा.वी.शिंदे, रवी वाकळे , तालुका प्रमुख राजेंद्र भगत, सरपंच विक्रम गायकवाड, निसार शेख, जीवा लगड, रघुनाथ झिने आदी उपस्थित होते.
गाडे म्हणाले, नगर तालुक्यातील गेलेल्या गद्दारांना पक्ष सोडायचा होता. त्यांना फक्त कारण हवं होतं. त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी पक्ष सोडला आहे. ज्यावेळेस ते मुंबईला पक्षप्रवेशासाठी गेले त्यावेळेस त्यांनी फक्त तीन गाड्या घेऊन गेले. मला वाटलं 70ते 80 गाड्यांचा ताफा असेल काहीच दिसले नाही यावरूनच त्यांची किंमत समजली आहे. संदेश कारले यांना जिल्हाप्रमुख पदही द्यायची मी तयारी दर्शवली होती. परंतु घरच्यांना विचारतो असे कारण सांगून पुन्हा या विषयाला बगल दिली. पक्षाने आणखीन काय द्यायला हवं होतं दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य एकदा सभापती जिल्हा उपप्रमुख पद असे अनेक पद देऊनही पक्षाशी गद्दारी केली असेल तर येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक यांना जागा दाखवून देतील. मी यांचा पराभव केल्याशिवाय निवृत्ती घेणार नाही असा सणसणीत इशारा गाडे यांनी कारले यांना दिला आहे.
नव्या जोमाने आता पक्ष बांधायचा आहे. संघटना मजबूत करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. नगर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आजवर मी जेवढ्या जागा जिंकलो आहे. तेवढ्याच जागा येणाऱ्या निवडणुकीत जिंकून दाखवीन असे गाडे यांनी ठणकावून सांगितले.
प्रत्येकाला फोन केला पण यांच्या पाठीशी कोणी उभा राहिले नाही. मी गाडे सरांना मानतो. आणि त्यांनाच पाहून पक्षात आहे ते सांगतील तो आदेश माझ्यासाठी मान्य आहे . त्यामुळे मी शेवटचा श्वासापर्यंत ठाकरे गटाशी प्रमाणिक राहील असे मत सभापती प्रवीण कोकाटे यांनी मांडले.
शरद झोडगे पक्षाशी एकनिष्ठ नव्हतेच : गाडे
नागरदेवळे गटात शरद झोडगे यांना जिल्हा परिषद ची उमेदवारी दिली लोकांची नाराजी असताना सुद्धा त्यांचा प्रचार गावागावात जाऊन मी केला. पण त्यांनीही पक्षाशी गद्दारी केली. मुळात ते पक्षाशी कधी एकनिष्ठ नव्हतेच असा टोलाही झोडगे यांना त्यांनी लगावला.
नगर तालुक्यात संदेश कार्ले हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती आदी पदे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भूषवले आहेत प्राध्यापक शशिकांत गाडे आणि त्यांचे गुरु शिष्याचे नाते आहे गाडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कार्ले काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे


