आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते आणि तरुणांनी शिंदे गटात प्रवेश केला असून, यामुळे नंदुरबारमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.नंदुरबारमध्ये निवडणुकीपूर्वीच शिंदे गटात इनकमिंग सुरू झाली आहे. तळोदा शहरात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्ते तसेच तरूणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी तळोदा तालुक्यातील अनेक तरूणांनी धनुष्यबाण हाती बांधलं. या पक्षप्रवेशामुळे निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.
माजी मंत्री पद्माकर वळवींचा काँग्रेसमध्ये प्रवेश
एकीकडे नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे तर, दुसरीकडे भाजप नेत्यानं काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपाची साथ सोडत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवास्थानी भेट घेऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी पद्माकर वळवी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले आहे.


