माजीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते, परळीचे आमदार धनंजय मुंडे काही वर्षांपूर्वी खून झाला असता, परंतु त्यांना एका महाराजांनी वाचवले, असा एक आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. त्यावर धनंजय यांच्या भगिनी तथा भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी, मी असल्या बिभत्स आरोपांवर उत्तर देणार नाही, अशी प्रतिक्रिया मंगळवारी दिली.
परळी वैजनाथ येथे नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या निवडणूक मतदानाला सुरुवात झाली. त्याचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी, मध्य प्रदेशात काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांचा खून झाला असता, परंतू त्यांना इंदोर येथील आध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांनी मध्यस्थी करून वाचवले, असा आरोप केल्याचे माध्यम प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आपण असल्या बिभत्स आरोपांवर उत्तर देणार नाही असे सांगितले.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, आम्हाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात येण्यापूर्वी असल्या बिभत्स आरोपांपासून दूरच ठेवले आहे. असल्या कोणत्याही चर्चा कधी कानावर येऊ दिल्या नाहीत.
गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांच्या भगिनी ऊर्मिलाताई केंद्रे या नगध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची स्थानिक आघाडी निवडणूक लढवत आहे. गंगाखेडमध्ये गुट्टे विरुद्ध केंद्रे, अशी लढत असून, माजी आमदार मधुसुदन केंद्रे यांच्या पत्नी ऊर्मिलाताई या धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत.
तेथील प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर काही आरोप केले होते. त्या आरोपांना आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही उत्तरे दिली. गुट्टे यांनी धनंजय मुंडे हे गुंडांचे पाठीराखे असून, त्यांचेच हात रक्ताने बरबटलेले आहेत. त्यांचा मध्य प्रदेशात खून झाला असता, पण त्यांना भैय्यू महाराजांनी वाचवले, असा आरोप गुट्टे यांनी मुंडेंवर केला आहे.
परळीचे राजकारण मुंडे भावंडांभोवती फिरते आहे, या परिस्थितीविषयी प्रश्न विचारले असता मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्ही बहीण-भाऊ असण्यापेक्षा आधी नेते आहोत. वेगवेगळ्या पक्षात आम्ही सक्रीय आहोत. आपण भाजपच्या नेत्या तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आहेत. राजकीय परिस्थितीत प्रत्येकवेळी, ठिकाणी बहीण-भाऊ हे नाते नसते.
निवडणुकीवर बोलताना पंकजा मुंडे यांनी महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करून बीड जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांमध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.


