जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात सात वाजण्याच्या सुमारास येथे कुख्यात गुंड आणि पैलवान सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात व्यक्तींकडून सात राऊंड गोळीबार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. 4 गोळ्या सागरच्या अंगात घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या धक्कादायक घटनेमुळे जामखेड शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मोहळकर रोडने जात असताना अचानक हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात हलवले आणि पुढील उपचारांसाठी नगरमध्ये नेण्यात आले.
सागर मोहळकर हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलम 307 नुसार त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तो नुकताच कारागृहातून जामीनवर बाहेर आला होता. जामखेड शहर आणि तालुक्यात त्याची मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
सागर मोहोळकर हा पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ आला कानशिलात लगावल्यानंतर चर्चेत आला होता. धाराशिव इथल्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत गेल्यावर्षी 11 एप्रिल 2025मध्ये मोहोळकर याने घायवळ याच्या कानशिलात लगावली होती. यानंतर सागर मोहोळकर याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी अधिकच चर्चेत आली.
सागर मोहोळकरचा गुन्हेगारीचा इतिहास भयंकर आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातील पक्का खिलाडी आहे. त्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना, सागरने तुरुंगात देखील आणखी एकाचा खून होता, अशी माहिती मिळते. यातून त्याचे गुन्हेगारी निगडीत असलेले अनेक किस्से आहेत. एखाद्या जुन्या वादातूनच सागरवर हा हल्ला झाल्याचे पोलिसांकडून समजते.


