सोनई अत्याचार प्रकरण संजय वैरागर यांची जयदीप कवाडे यांनी घेतली भेट
मारहाण करणाऱ्या आरोपींवर मोका लावा, वैरागर कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या –जयदीप कवाडे यांची मागणी.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सोनई गावात मातंग समाजातील युवक संजय वैरागर याच्यावर काही हिंदुत्ववादी गावगुंडांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेत वैरागर यांचे हातपाय तोडण्यात आले, डोळा फोडण्यात आला, तसेच अंगावर लघुशंका करण्यात आली. या भीषण अत्याचारानंतर पीडित संजय वैरागर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन वैरागर यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, युवक प्रदेश संघटक कपिल लिंगायत ,जिल्हा नेते किरण गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमी ताई भिंगारदिवे, युवक जिल्हा सचिव सागर ढगे, जिल्हा संघटक सुरेश भिंगारदिवे,शांतवणं साळवे, राधा पाटोळे, विशाल गायकवाड ,अनिकेत विधाते, प्रवीण कोल्ह, भारत कोल्ह, सिद्धांत गायकवाड, ऋषि गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयदीप कवाडे म्हणाले, संजय वैरागर यांना झालेली अमानुष मारहाण ही केवळ व्यक्तीगत नाही, तर मातंग समाजावर झालेला हल्ला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, हे दुर्दैवी आहे. आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई आवश्यक आहे. या घटनेतील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच पीडित वैरागर कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे आणि या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करून आरोपींना अटक करण्यात यावी.
सोनई अत्याचार प्रकरण, वैरागर कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या –जयदीप कवाडे यांची मागणी
- Advertisement -


