अहिल्यानगर -येथील अंबा कॉलनी, पंचवटीनगर, भिस्तबाग चौक परिसरात वाहने रस्त्यावर लावण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने भाडेकरुच्या हातावर लोखंडी कोयत्याने वार करून त्याला जखमी केल्याची घटना १ डिसेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र मोहन तनपुरे (वय-३०, धंदा-कपड्याचे दुकान) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबा कॉलनी येथील त्यांचे घरमालक बाळासाहेब बारस्कर यांच्या भाड्याच्या खोलीत ते राहतात. त्यांच्या घरासमोर राहणारा प्रिन्टोपॉल मुट्टत हा इसम नेहमी घरमालकांना आणि भाडेकरूंना शिवीगाळ करत असतो.
दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता प्रिन्टोपॉल मुट्टत हा त्याच्या मोटारसायकलवरून पडला. त्याने रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळेच आपण पडल्याचे सांगून भाडेकरूंना तसेच घरमालक बाळासाहेब बारस्कर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी राजेंद्र तनपुरे यांनी घरमालकांना बोलावून घेतले.घरमालक बाळासाहेब बारस्कर, राजेंद्र तनपुरे, राहुल तनपुरे, हरिभाऊ धुमाळ यांच्यासह जमलेल्या लोकांनी प्रिन्टोपॉल याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने घरमालकास शिवीगाळ व धमकी दिली.
वाद वाढल्यानंतर प्रिन्टोपॉल घरातून लोखंडी कोयता घेऊन आला. त्याने राजेंद्र तनपुरे यांना मारण्यासाठी कोयता उगारला असता, तो त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ लागला आणि ते जखमी झाले. रक्तस्राव सुरू झाल्याचे पाहून आरोपी प्रिन्टोपॉल घटनास्थळावरून पळून गेला. जखमी राजेंद्र तनपुरे यांनी तातडीने अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रिन्टोपॉल मुट्टत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


