राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहत असल्याने आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेचा पेच कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पण ज्या जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आतमध्ये आहे, त्याची निवडणूक महापालिकेसोबत लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील आठवड्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यासोबत १२ जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. राज्यातील २९ महापालिकांसोबतच १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची चाचपणी आयोगाने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे
ठाणे, पालघर, नाशिकसह २० जिल्हा परिषदा आणि अहिल्यानगर, जालना, बीडमधील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाचा पुढील निकाल येईपर्यंत या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे, तिथे महापालिका निवडणुकांसोबत मतदान होण्याची शक्यता आहे. याबाबत पुढील काही दिवसांत अपडेट समोर येण्याची शक्यता आहे.
कोणत्या १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार ?
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याबाबत आयोगाकडून चाचपणी कऱण्यात येत आहे. वरील १२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा आहे. पण २० जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याबाबत कोर्टाकडून निवडणुका घेण्यास मनाई करण्यात आली आहे.


