Tuesday, October 28, 2025

शेअर मार्केट फसवणूक प्रकरण ; शेवगावच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटीस

बोधेगाव: निधी शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी अटक असलेल्या साईनाथ कल्याण कवडे याच्या ऍसिटेक सोल्युशन कंपनीबाबतचा तपास सदोष करणे, पुरावे असूनही आरोपींना अटक न करणे, साक्षीदारांच्या जबाबांवर स्वाक्षरी न करणे, योग्य प्रक्रियेचे पालन व आवश्यक पुरावे गोळा न करणे, तपासात निष्काळजीपणा, आरोपींना मदत होईल असे दोषारोपपत्र तयार करणे यांसारख्या अनेक चुका केल्याचे आरोप पोलिसांवर करणाऱ्या याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेवगावच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या साईनाथ कवडे याला पोलिसांकडून व तपासी यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न होत असून, या गुन्ह्याचा तपास सीबीआय व विशेष तपास यंत्रणा विभागाकडे सोपविण्याची मागणी करणारी याचिका यातील मूळ फिर्यादी अवधूत विनायक केदार (रा. शेवगाव) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी घेताना तत्कालीन पोलिस अधिकारी व शासकीय यंत्रणा यांना आपापले म्हणणे मांडण्याचे आदेश न्या. श्रीमती विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी दिले.

रावताळे- कुरूडगाव (ता. शेवगाव) येथील साईनाथ कल्याण कवडे याच्या विरोधात 330 जणांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. या फसवणुकीचा आवाका लक्षात घेता शेवगाव पोलिसांनी त्यास सात महिन्यांपूर्वी अटक केलेली आहे. मात्र, याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये पोलिस व तपासी यंत्रणेकडून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याकडून करण्यात आला आहे.

पाच हजार कोटींपेक्षा जास्त व्याप्ती असलेल्या या फसवणुकीच्या गुन्ह्यात कवडे यास जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. गुंतवणूकदारांनी त्या विरोधात दिलेले असंख्य अर्ज, कागदपत्र व पावत्या चार्जशीटमध्ये दाखविण्यात आलेल्या नाहीत. प्रत्यक्षात 10 हजारांहून अधिक गुंतवणूकदार असताना केवळ 330 जण दोषारोपपत्रासोबत दाखवले आहेत.

गुंतवणूकदारांना रक्कम परत देण्याऐवजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ईडी व आयकर विभागाची भीती दाखवून धमकावण्यात आले, त्यामुळे अनेक नोकरदार व बडे गुंतवणूकदार तक्रारीस घाबरत आहेत. आरोपीने गुंतवणूकदाराच्या पैशातून घेतलेली संपत्ती व मालमत्ता जप्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांचेकडे केलेली असताना देखील त्याबाबत ठोस कारवाई झालेली दिसत नाही.

गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपीने इस्माईलपूर (ता. पैठण) येथील जमीन छत्रपती संभाजीनगर येथील एका बड्या राजकीय लोकप्रतिनिधीच्या वाहनचालकाच्या पत्नीच्या नावे केलेली आहे. या व्यवहारात हस्तक्षेप करून प्रशासनाने ती जप्त करावी. या गुन्ह्यात बड्या नेत्याकडून हस्तक्षेप झाल्याने तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत.

एवढ्या मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून ‌‘कॅश फ्लो‌’ तपासला नसून ‌‘फॉरेन्सिक ऑडिटदेखील‌’ केलेले नाही. आरोपीने गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केलेली मालमत्ता त्याचे कुटुंबातील फरार आरोपी आई-वडील, भाऊ, साईनाथ याची पत्नी, भावजय हे परस्पर विल्हेवाट लावत आहेत, पुरावे नष्ट करत आहेत, त्यामुळे त्यांनाही तातडीने अटक करावी, मात्र, अकरा महिन्यांपासून गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना ते सापडत नाहीत, त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्यांना अटकेपासून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.

एसीटेक सोल्युशन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा या गुन्ह्यात सहभाग असतानासुद्धा त्यांची चौकशीदेखील झालेली नाही. आरोपीने शेवगाव येथील सराफ व्यावसायिकाकडून 20 किलोपेक्षा अधिक सोने खरेदी केलेले असताना त्या व्यावसायिकाची साक्ष नोंदविण्यात आलेली नाही व आरोपींचे बँक लॉकर सील करण्यात आलेले नाही.

सध्या या प्रकरणी अटक असलेला आरोपी साईनाथ कवडे यास नाशिक रोड मध्यवर्ती तुरुंगात तुरुंग प्रशासनाकडून वैद्यकीय कारणांचा आधार घेऊन सुटका करण्यासाठी मदत केली जात आहे, तसेच अवैध सवलती दिल्या जात आहेत, असे अनेक आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. याचिकाकर्ता अवधूत विनायक केदार यांच्या वतीने ॲड. अनंत देवकते काम पाहत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles