अहिल्यानगर-धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ कोठला परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या 30 जणांना न्यायालयाने शुक्रवारी (3 ऑक्टोबर) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
नगर शहरातील बारातोंटी कारंजा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकूरावरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकारामुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत सोमवारी (29 सप्टेंबर) सकाळी सुरूवातील कोतवाली पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला व नंतर अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्ग कोठला परिसरात रोखला होता.काही वेळातच या रस्तारोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमाव एकाऐकीच आक्रमक झाला व त्यांनी दगडफेक सुरू केली. यामध्ये वाहनांचे नुकसान होऊन पोलीस जखमी झाले होते. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे 150 ते 200 जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे 47 संशयितांचे नावे निष्पन्न केली असून त्यातील 30 जणांना अटक केली आहे. तसेच सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांना नोटीस देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे.
अटक केलेल्या 30 जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी अटकेतील 30 जणांना शुक्रवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांना येथील कारागृहात न ठेवता नाशिक कारागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या सर्व 30 जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी दिवसभर व रात्री धरपकड करून एकुण 36 जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील सहा अल्पवयीन असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले तर 30 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सुमारे 150 ते 200 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ चित्रिकरण व गुप्त खबर्यामार्फत माहिती काढून उरर्वरित संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. इतर संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.


