तहान लागली की, डोळ्यांसमोर सगळ्यात आधी येतो तो उसाचा थंडगार रस. गल्लीबोळात, समुद्रकिनारी किंवा बाजारात दिसणाऱ्या उसाच्या रसाशी आपल्या सगळ्यांच्याच आठवणी जोडलेल्या आहेत. लहानपणी पाच-दहा रुपयांत मिळणारा हा रस आजही अनेकांचा फेवरेट आहे. रस्त्याच्या कडेला उभं राहून ताज्या उसाचा रस पिण्याची मजाच वेगळी असते. पण, आता हा पारंपरिक ऊसाचा रस सोशल मीडियावर एका नव्या आणि भन्नाट अवतारात व्हायरल होत आहे. ऊस आणि स्ट्रॉबेरी यांचा अनोखा मिलाफ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा निर्माण करत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका स्ट्रीट फूड विक्रेत्याचा असून, तो नेहमीच्या उसाच्या रसाला वेगळीच ट्विस्ट देताना दिसतो. या व्हिडीओमध्ये विक्रेता आधी उसाच्या कांड्या घेतो आणि त्यांच्या मधल्या भागात थेट ताज्या स्ट्रॉबेरीज भरतो. नंतर ही काठी ज्यूस मशीनमध्ये टाकली जाते. मशीनमधून बाहेर पडणारा रस नेहमीसारखा पांढरट नसून गुलाबी रंगाचा दिसतो.
उसाची नैसर्गिक गोडी आणि स्ट्रॉबेरीचा थोडासा आंबटपणा एकत्र येऊन, एक वेगळाच रंग आणि चव तयार होते. रसामध्ये स्ट्रॉबेरीचे छोटे तुकडेही दिसतात, ज्यामुळे तो आणखी आकर्षक वाटतो. हा प्रयोग पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत कोट्यवधी व्ह्युज मिळाले असून, तो वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ प्रसिद्ध फूड व्लॉगर राहुल ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहता क्षणी अनेकांचे लक्ष वेधून घेतो. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.


