पोलीस शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कायम सज्ज असतात. वर्षाचे १२ महिने, ऊन-पाऊस, सण-उत्सवांची पर्वा न करता पोलीस कायद्याचं संरक्षण करतात. आणि याच पोलिसांना मदत करणाऱ्या एका भटक्या कुत्र्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा कुत्रा मरीन ड्राइव्हवर गस्त घालणाऱ्या पोलिसांसोबत दररोज फिरताना दिसतो.
हा व्हिडीओ streetdogsofbombay या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. विशेष बाब म्हणजे हा कुत्रा भटका असला तरी तो पोलिसांना त्यांच्या कामात सातत्याने मदत करतो. मरीन लाईन्सच्या समुद्रकिनाऱ्यावर दररोज शेकडो-हजारो पर्यटक येतात. कोणी गैरवर्तन करत असेल, अस्वच्छता पसरवत असेल किंवा भांडण करत असेल, तर हा कुत्रा त्याबाबत पोलिसांना सतर्क करतो.


