राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. अशातच या निवडणुकांच्या तोंडावर पक्ष बांधणीसाठी उच्चपदस्थ नेत्यांपासून सामान्य कार्यकर्ते थेट मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात कोण गुलाल उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेशालाही गती प्राप्त झाली आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा देणारी बातमी समोर आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कठीण काळात मोलाची साथ देणाऱ्या नेत्यानेच यावेळी पक्षाची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सोडचिठ्ठी दिली आहे.
राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अहिल्यानगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचे निश्चित केले आहे.
विशेष म्हणजे शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले नेवासाचे माजी आमदार, माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आता मात्र पक्षाला राम राम केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. तर ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे मृदा आणि जलसंधारण विभागाचे मंत्री होते. त्यामुळे एका बड्या नेत्याने साथ सोडल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


